पोलीस
पोलीस
आपले रक्षण करतात.
आपल्या देशात इंग्रजांनी पोलीसखाते सुरू केले. त्यापूर्वी प्रत्येक राजाकडे कोतवाल असत. इंग्रजांनी पोलीसखाते सुरू केले तेव्हा वरच्या हुद्द्यांवरचे अधिकारी इंग्रजच असत. स्वातंत्र्य मिळाल्यावर मात्र परिस्थिती बदलली आणि पोलीस खात्यात भारतीयांना स्थान मिळू लागले. पोलिस खात्यातही अनेक विभाग असतात. केंद्रीय राखीव पोलीस दल, वाहतूक पोलीस, सामान्य पोलीस, रेल्वे पोलीस, सशस्त्र पोलीस दल व गुप्त पोलीस दल असे ते विभाग आहेत. सुशिक्षित, भरपूर उंची असलेल्या, निरोगी अणि दणकट तरूणतरूणींना पोलीस खात्यात भरती करून घेतले जाते. त्यासाठी त्यांना खास परीक्षा द्यावी लागते.
प्रत्येक देशाचे कायदेकानून ठरलेले असतात. सामान्य नागरिकांनी त्यांचे पालन करावे अशी सरकारची अपेक्षा असते. त्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिक कायदे पालन करीत असतातही. परंतु समाजात असेही काही वाईट लोक असतात जे कायदे तोडून गुन्हे करतात. हे समाजकंटक चोरीमारी, खून, अमली पदार्थांची तस्करी,लहान मुलांचे आणि मुलींचे अपहरण, खंडणी उकळणे, जुगार, गावठी दारू इत्यादी गैरउद्योगात गुंतलेले असतात. अशा उद्योगांपासून त्यांना रोखणे आणि सामान्य नागरिकांना त्यांचे जीवन सुरळीतपणे जगता यावे म्हणून मदत करणे हे पोलिसांचे मुख्य कार्य असते.
त्याशिवाय हल्ली दहशतवादाचा खूपच प्रसार झालेला असल्यामुळे पोलिसांचे काम अधिकच अवघड होऊन बसले आहे. मोठमोठ्या नेत्यांची सुरक्षा, कुठेतरी बॉम्ब असल्याचा फोन आला तर लगेच तिथे जाऊन पाहाणी करणे आणि खरच असल्यास तो निकामी करणे अशी कामे पोलीसांना आपला जीव धोक्यात घालून करावी लागतात.
इतर सरकारी कर्मचा-यांच्या मानाने पोलिसांचे काम जिकीरीचे असल्याने त्यांना चांगले वेतन दिले जाते. सरकारी घरे राहायला मिळतात. कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याला राष्ट्रपतीपदक दिले जाते. उल्लेखनीय कार्य करणा-या पोलीस अधिकाऱ्याची सत्कार जनताही करते.
असा आहे पोलीस जनतेचा मित्र.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: