अनाथालयास भेट

 अनाथालयास भेट


      माझी रंजूआत्या जीवनज्योती नामक अनाथालयात हल्लीच काम करायला जाऊ लागली आहे. तिच्याकडून त्या आश्रमाबद्दल माहिती जशीजशी आम्हाला समजू लागली तसतसे आम्हा सर्वांना वाटू लागले की आपण त्या आश्रमात एकदा जायला हवे. तेव्हा मग आत्या मला म्हणाली की तुझ्या वाढदिवसाला आपण तिथे जाऊ. नेहमी तू तुझ्या मित्र मैत्रिणींना वाढदिवसाला घरी बोलावतेस. त्यांना तू बोलावच, पण त्याशिवाय आमच्या अनाथाश्रमात येऊनही तुझा वाढदिवस तू साजरा कर.

        मग त्या मुलांना काय भेट द्यावी ह्या विषयी आम्ही खूप विचारविनिमय केला. तेव्हा आत्या म्हणाली की त्या मुलांसाठी तू चांगल्या चित्रपटांच्या सीडी दे, त्या आम्हीत्यांना मोकळ्या वेळात दाखवू. मग वाढदिवसानंतर जो रविवार आला त्या दिवशी मी, माझी आई आणि बाबा जीवन ज्योती अनाथालयात गेलो. सोबत आम्ही चार्ली चॅप्लीन आणि टॉम ऍण्ड जेरीच्या सीडी नेल्या होत्याच पण त्याशिवाय त्या मुलांना देण्यासाठी आम्ही चॉकलेटआणि वह्यापेन्सिली नेल्या होत्या.

        तिथे गेल्यावर मला अगदी वेगळाच अनुभव आला. ज्यांचे आईवडील ह्या जगात नाहीत किंवा काही कारणामुळे त्यांना सांभाळायला तयार नाहीत अशा मुलांना अनाथाश्रमात राहायला यावे लागते. त्यातील काही बाळे तर एवढी छोटी होती की रांगेत पाळण्यात झोपवलेल्या त्या बाळांना बघून मला खूप रडूच आले. वाटले की आईवडिलांच्या प्रेमाची छत्रछाया असलेली आम्ही मुले किती नशीबवान आहोत. मला एवढेसे जरी लागले तरी माझ्या आईचा जीव कासावीस होतो. मी रडू लागले की घरातले सगळेजण धावत येतात. मग ह्या मुलांचे लाड कोण करीत असेल?

        थोड्या मोठ्या मुलांची राहाण्याची, जेवणाखाणाची जागा वेगळी होती. त्याच्यासाठी खेळाचे मैदान होते, सिनेमा आणि टीव्ही दाखवण्याचे थिएटर होते. त्यांच्यासाठी सगळे काही होते. फक्त आईबाबा नव्हते, आत्या मला म्हणाली की ज्या जोडप्यांना मुलं नसतात अशी जोडपी ह्यातीलच काही मुलांना दत्तक घेतात आणि त्यांना आपल्या मुलांप्रमाणे वाढवतात, मुले घेऊ इच्छिणा-या पालकांची आम्ही सगळी चौकशी करतो आणि मगच मुलांना दत्तक देतो,

        ते ऐकून मला जरा बरे वाटले. ह्या अनाथालयातील सर्व मुलांना त्यांचे हक्काचे घर लौकरच मिळो, अशी पार्थना करूनच मी तिथून बाहेर पडले. ह्यापुढे दर वर्षी वाढदिवसाला मी तिथेच जाणार,



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.